आरोग्य सल्ला -MH9 LIVE NEWS - - - -
सध्या कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र कोरोना च्या लसीवर संशोधन सुरू आहे असं ऐकायला मिळतं. मग बर्याच जणांना प्रश्न पडतो की लस म्हणजे नेमके काय ?
प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसींत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात देणे म्हणजे लसीकरण होय.
जगातील पहिली शास्त्रशुद्ध लस अभ्यास करून व शास्त्रीय रीत्या संशोधन करून प्रथमतः लस तयार करण्याचे श्रेय एडवर्ड जेन्नर यांच्याकडे जाते. गायीचे दूध काढणाऱ्या गवळ्यांना देवीविरुद्ध प्रतिकारक्षमता प्राप्त झालेली असल्याचे १७७८ च्या सुमारास जेन्नर यांच्या लक्षात आले. मानवातील देवीसदृश पण सौम्यतर अशा गोदेवी (व्हॅक्सिनिया) या रोगाची बाधा झालेल्या गायींच्या सतत सान्निध्यात राहिल्यामुळे गवळ्यांना ही प्रतिकारक्षमता प्राप्त झालेली असल्याचे पुढे त्यांना आढळून आले (यावरूनच व्हॅक्सिन-लॅटिन Vacca म्हणजे गाय-हा शब्द इंग्रजी भाषेत आलेला आहे). जेन्नर यांनी १७९६ मध्ये एका गवळ्याच्या शरीरावरील गोदेवीच्या फोडातील द्रव काढून तो जेम्स फिक्स या आठ वर्षाच्या मुलाला टोचला. सुमारे दीड महिन्यानंतर त्या मुलाला जेन्नर यांनी देवीच्या फोडातील द्रव टोचला तेव्हा रोगाचा उद्भव झाला नाही, असे आढळून आले. अशाच आणखी एका प्रयोगानंतर १७९८ मध्ये त्यांनी आपले निष्कर्ष ग्रंथरूपाने मांडले.
कालांतरानं लूई पाश्चर यांनी अशा प्रकारच्या इंजेक्शन्स (सुईद्वारे पदार्थ शरीरात घालण्याच्या क्रियेस) व्हॅक्सिनेशन ही संज्ञा जेन्नर यांच्या सन्मानार्थ दिली कालांतराने व्हॅक्सिन (लस) ही संज्ञा सर्व प्रकारच्या विशिष्ट रोगप्रतिबंधकांसाठी ( सूक्ष्मजंतू, व्हायरस यांच्यापासून निर्माण होणारे पदार्थ तसेच परागकणांचे अर्क वगैरे) वापरण्यात येऊ लागली.
आज कोणताही रोग आला की त्यावर औषधाबरोबरच लस शोधण्यासाठी संशोधन सुरू होते. म्हणून लक्षात घ्या लस हे औषध नसून प्रतिबंधात्मक उपाय योजना आहे.
अत्यंत उपयुक्त अशी माहिती आवडल्यास जरुर शेअर करा व लाईक करा. अशी उपयुक्त माहिती नियमित वाचण्यासाठी MH9 LIVE NEWS या फेसबुक पेजलाही लाईक करा