कोल्हापूर हादरले - एकाच दिवशी सहा पॉझिटिव्ह आढळले - रेडझोन व पुण्या मुंबईच्या लोकांना इकडे पाठवू नका - पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची विनंती
लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्याने व पुण्या मुंबईचे नागरिक लोंढ्यांने कोल्हापूरात शिरु लागल्याने आज तब्बल सहा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या रुग्णांमध्ये -जयसिंगपूर येथील 18 आणि 20 वर्षांचे 2 तरुण
-राधानगरी (खिंडी व्हारवडे) येथील 23 वर्षांचा 1 तरुण आणि 45 वर्षांची 1 महिला असे 2
-गडहिंग्लजमधील कवळीकट्टीतला 35 वर्षांचा 1 व्यक्ती-भुदरगड मधील 1 रुग्ण, अशा एकूण 6 नवीन रुग्णाचा समावेश आहे. यापैकी भुदरगड येथील रुग्णाने मुंबईवरून चालत आल्याची माहिती मिळाली आहे तर राधानगरीतील 2 रुग्ण हे आधीच सीपीआर रुग्णालयात दाखल असलेल्या खिंडी व्हरवडे येथील 2 रुग्णांचे नातेवाईक आहेत. तसेच जयसिंगपूर येथील नवीन दोन्ही रुग्णांनी आधी सापडलेल्या दोन रुग्णांसोबत सोलापूर ते कोल्हापूर असा प्रवास
केला होता.
आज सापडलेले रुग्ण मुंबई आणि सोलापूर येथून कोल्हापूरला आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 36 वर गेली असून रेड झोन च्या दिशेने वाटचाल पाहून लोकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्यावर गेल्या काही दिवसांत तब्बल 86 हजारवर बाहेरून आलेल्या नागरिकांचा कोल्हापूरात प्रवेश झाला आहे. तर काल एका दिवसात 600 गाड्यांमधील 400 गाड्या फक्त मुंबईहून आल्या आहेत. यातील बर्याच नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.
बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे जिल्ह्याच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेवर ताण पडला आहे आणि रिपोर्ट विलंबाने प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा लोकांना रुग्णालयात दाखल करणे व क्वारंटाईन करणे याला मर्यादा येत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व रेड झोन व मुंबई च्या पोलीस आयुक्त व प्रशासनाला नागरिकांना कोल्हापूरला जाण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे. तसेच अशा रेड झोन मधून कोल्हापूरला प्रवासाला ई पास देऊ नये अशी विनंती केली आहे.