कोरोणा विषाणू संदर्भात गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र बोरसे यांचे आवाहन
नंदुरबार (प्रतिनिधी वैभव करवंदकर) :- कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभर विविध उपाय योजना केल्या जात असताना, शासनाने लॉकडाऊनच्या माध्यमातून नागरिकांना *"बस बस घरात"* गाणे सोशल मीडियावर व्हायरल करुन घरीच थांबण्याचे आवाहन देवेंद्र बोरसे करीत आहे. नावाजलेल्या सैराट या चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर जनजागृती गीत सादर केले आहे. सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून हे गीत जगभर व्हायरल झाले आहे.
चीनच्या योहान शहरातून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना (covid-19) या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात झाला आहे. संसर्गातुन पसरणाऱ्या या विषाणूने जगभरातील लक्षावधी नागरिकांचे प्राण घेतले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने 23 मार्च पासून देशात लॉकडाऊन जाहीर केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद करण्यात आले. अशा परिस्थितीतही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांपैकी अनेक जण कोरोनामुक्त होत असतानाच, पाच ते सात टक्के एवढ्या रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. असे असतानाही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी आणि प्रख्यात व्यक्तींनी वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला "घरीच रहा, सुरक्षित रहा" हा संदेश दिला. अनेकांनी याबाबत विविध प्रकारची गाणी तयार करून जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यात भर म्हणून नंदुरबार येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या कार्यालयात विषय सहायक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक श्री देवेंद्रकुमार जगन्नाथ बोरसे यांनी सैराट या गाजलेल्या मराठी चित्रपटातील नावाजलेल्या झिंगाट या गीताच्या चालीवर बस बस घरात हे एक जनजागृतीपर गीत लिहून ते स्वतः गायिले आहे. या गीताच्या माध्यमातून कोरोनाची पार्श्वभूमी सांगतानाच; घरी बसणे का आवश्यक आहे ? याची माहिती विषद करून, त्यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी गायलेले हे गीत सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले असून, नागरिक आता 'बस बस घरात', असे म्हणून एकमेकांना घरातच बसण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
श्री देवेंद्र बोरसे हे जिल्हा परिषदेचे शिक्षक असून, प्राथमिक शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेचे जिल्हा नेते आहेत. नंदुरबार येथून प्रसारित होणाऱ्या एन सेवन न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीचे ते समन्वयक आहेत. शिक्षक म्हणून सेवेत लागण्यापूर्वी त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक गावकरी, दैनिक जनसेवक, दैनिक पोल-खोल, साप्ताहिक नंदभूमी, नंदसेवक अशा विविध वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. दैनिक लोकमततर्फे दिला जाणारा "बाबा दळवी शोध पत्रकारिता पुरस्कार" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना सन 2001 या वर्षी प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा दहिंदुले ता. नंदुरबार येथे काम करत असताना त्यांनी शाळेला जिल्हा व राज्य स्तरावरील विविध पुरस्कार मिळवुन दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सादर केलेले हे गीत तयार करण्यासाठी त्यांना संगीत संयोजक म्हणून राकेश पी बोरसे यांनी तर ध्वनि चित्र मुद्रणासाठी श्री निलेश पवार व श्री उमेश पांढरकर या पत्रकार मित्रांनी सहकार्य केले. तर गाण्याचे ध्वनिचित्र संपादन श्री रामचंद्र बारी यांनी केले आहे. सध्या देवेंद्र बोरसे यांनी लिहिलेले व गायिलेले "बस बस घरात" हे गीत सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे.