जिल्हा परिषदेतर्फे कोविड १९ बाबत स्वच्छाग्रहींना ऑनलाईन प्रशिक्षण
फोटो - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्यावतीने कोविड 19 या विषयी आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणाचा अनरद तालुका शहादा जिल्हा नंदूरबार येथे लाभ घेताना स्वच्छाग्रही व स्वयंसेवक
नंदुरबार ( प्रतिनिधी वैभव करवंदकर ) :-
कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रही व इतर स्वयंसेवकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले . प्रशिक्षणात एकूण 988 स्वच्छाग्रहीनी सहभाग नोंदवला.
राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत कार्यरत असलेले स्वच्छाग्रही तसेच इतर ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा तसेच इतर विभाग प्रमुख व जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविले जात आहेत.
कोरोना विरुद्धच्या या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताग्रही सक्रिय झालेले असून, त्यांचेमार्फत ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्तरावर कोरोनाबाबत जाणीव जागृती केली जात आहे. ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक व इतर स्वयंसेवकांना कोविड 19 याविषयी अधिकची माहिती मिळावी व या स्वयंसेवकांचा ग्रामपातळीवर सहभाग आणखी वाढावा, या उद्देशाने त्यांच्यासाठी आज दिनांक २ मे 2020 रोजी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणादरम्यान कोविड संकल्पना, श्वसनसंस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, अधिक जोखमीचे गट यांनी घ्यावयाची काळजी, मास्क वापर, प्रकार व मास्क वापरतांना घ्यावयाची काळजी, गाव पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवक व्यक्तींनी घ्यावयाची काळजी, कुटुंब व सार्वजनिक स्वच्छता, पाणी साठवण व स्रोत स्वच्छता, शौचालय वापर, मैला व्यवस्थापन, कोविड संभाव्य बाधित व्यक्तीसंबंधी घ्यावयाची काळजी, विलगीकरण म्हणजे काय, कोविड-19 या आजाराविषयी असलेले समज-गैरसमज, संसर्ग झालेली व्यक्ती किंवा विलगीकरण केलेल्या व्यक्ती यांची सामाजिक मानहानी व भेदभाव या विषयावर उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान अनेक ग्रामपंचायती अंतर्गत अँड्रॉइड मोबाइल नसलेल्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयात शारीरिक अंतर ठेवून प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. यामुळे ज्या स्वयंसेवकांकडे मोबाईलची सुविधा उपलब्ध नव्हती, अशा स्वयंसेवकांनाही या प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, युनिसेफचे बालाजी वरकड, नाशिक येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे डॉ. अनिल सोनवणे, डॉ.देशमुख, वासोचे विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे, आरोग्य विस्तार अधिकारी किशोर सोनवणे, जिल्हा कक्षातील विशाल परदेशी, योगेश कोळकर, कैलास कांजरेकर, नितीन पाटील व युवराज सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास जिल्ह्यातील स्वच्छाग्रही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदींनी सहभाग नोंदविला.